बुधवारपासून ‘सोलापूर ते स्वारगेट’ शिवशाही गाडी धावणार

सोलापूर : शिवशाही एसटीसाठी सोलापूरकरांची अखेर प्रतीक्षा संपली. येत्या आठवड्यात सोलापूर ते स्वारगेट शिवशाही धावणार आहे. वातानुकूलित असलेल्या गाडीचे तिकीट दर शिवनेरीच्या तुलनेने निम्मे आहेत. त्यामुळे ते प्रवाशांना परवडणारे आहेत. गाडीच्या दिवसातून तीन फेऱ्या सोलापूर ते स्वारगेट अशा होतील. गाड्यांची संख्या वाढल्यानंतर मात्र दिवसातून किमान पाच तरी फेऱ्यांचे नियोजन आहे.

सोलापूरहून सकाळी सहाला, साडेदहा वाजता आणि दुपारी साडेतीन वाजता गाडी पुण्यासाठी रवाना होईल. सकाळी सहाची वेळ असल्याने प्रवाशांना हुतात्मा एक्स्प्रेसला ही गाडी चांगला पर्याय ठरू शकते. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत १२ शिवशाही गाड्या सोलापूर विभागात दाखल होणार आहेत. प्रवाशांना सेमी लक्झरीच्या तुलनेत केवळ तीस रुपये जादा लागणार आहेत. त्या बदल्यात त्यांचा प्रवास हा सुपरफास्ट गारेगार होणार आहे. सोलापूर ते पुण्यासाठी प्रवाशांना ३९० रुपये लागतील.

शिवशाही ही वातानुकूलित गाडी असल्याने सेमी लक्झरीच्या तुलनेत ऑपरेटिंगमध्ये थोडासा बदल आहे. त्यामुळे गाडी चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी सोलापूर आगाराच्या चार चालकांना भोसरीच्या प्रशिक्षण केंद्रात पाठवण्यात आले आहे. मंगळवारपर्यंत ते प्रशिक्षण घेऊन येतील. यानंतर परिवहन राज्यमंत्र्यांच्या हस्ते ‘शिवशाही’ला हिरवा झेंडा दाखवला जाईल. शिवनेरीच्या जास्तीच्या तिकीट दरामुळे सोलापूरकरांनी शिवनेरीकडे पाठ फिरवली. परिणामी अवघ्या दोन ते तीन महिन्यांतच ही गाडी बंद करण्याची नामुष्की परिवहन मंडळ प्रशासनावर ओढवली होती.