‘त्या’ पत्रावरून जितेंद्र आव्हाडांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले…

महाराष्ट्र देशा टीम : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. सर्वत्र लॉकडाऊन असताना वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जायची परवानगी मिळतेच कशी ? असा सवाल विचारत या प्रकरणावरुन भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. या प्रकरणावरून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी या प्रकरणामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांच्या या आरोपाचा समाचार घेत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री  जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर एकच हल्लाबोल केला.

‘राज्यावर कोरोनासारखे संकट असताना केंद्राकडून काल गुरुवारी एक पत्रक आले आहे. या पत्रकानुसार पीपीई (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंटस) कीट घ्यायचे नाही, मास्क घ्यायचे नाही, वैद्यकीय कुठलेही साहित्य असेल ते केंद्राच्या परवानगीशिवाय घ्यायचे नाही, असे निर्बंध घालण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना, डॉक्टरांना ही कीट अत्यंत गरजेची आहे, पण केंद्र सरकारच्या मनात महाराष्ट्रबद्दल काही किंतू आहे का?’ असा सवाल करत आव्हाड यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. असं वृत्त न्युज १८ लोकमत यांनी दिल आहे.

पुढे ते म्हणाले, आम्हाला या प्रकरणावर राजकारण करायचं नाही आहे. परंतु, भाजपकडून नको त्या गोष्टीचं राजकारण केलं जात आहे. मग, या पत्रकावर भाजप पत्रकार परिषद घेऊन हे पत्रक मागे घेण्याची मागणी करेल का, असं म्हणत आव्हाड यांनी भाजपला टोला लगावला आहे.