मे पासून ‘पीएफ’ काढा ऑनलाईन

पीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधीबाबतची सर्व डोकेदुखी आता लवकरच दूर होणार आहे. कारण, आता मे महिन्यापासून तुम्ही तुमचे पीएफचे पैसे ऑनलाईन काढू शकणार आहात. व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
पीएफ काढून घेण्याचा अर्ज, पेन्शन मिळणे किंवा समूह विम्याचा फायदा मिळणे याबाबत ‘ईपीएफओ’ दरवर्षी अंदाजे 1 कोटी अर्ज येतात. त्यांच्यावरील प्रक्रिया वेगाने होण्यासाठी सर्व 123 फील्ड ऑफिसेसना केंद्रीय सर्व्हरशी जोडण्याचे काम सुरू आहे. सर्व प्रकारचे अर्ज ऑनलाइन सादर करता यावेत, यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे ईपीएफओ आयुक्त व्ही. पी. जॉय यांनी सांगितले. अर्ज ऑनलाइन सादर केल्यानंतर काही तासांमध्येच त्यावरील प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
येत्या 31 मार्चपर्यंत ईपीएफओ धारकांनी आधार कार्ड किंवा आधार कार्ड क्रमांक ईपीएफओला सादर करावा लागेल. पेन्शन बँक आणि बँक खाती आधार कार्डद्वारे जोडली जाणार आहेत. आधार कार्ड क्रमांक जोडला असेल, तरच रक्कम मिळेल. ईपीएफओची आतापर्यंत 50 कार्यालयं केंद्रीय सर्व्हरल जोडली असून, अजून 123 कार्यालयं जोडण्याचं काम सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर वर्गणीदारांना ऑनलाईन सेवेचा लाभ घेता येणार आहे.