पक्षस्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी राणेंच्या पक्षाने उधळला गुलाल

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काल स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाने तालुक्यात पाच ग्रामपंचायतीवर बिनविरोध सरपंच करत जिल्ह्यामध्ये खाते उघडले आहे. कॉंग्रेसला राम राम ठोकल्यानंतर नारायण राणे यांनी काल नव्या पक्षाची घोषणा केली आणि आज हा विजय मिळवत पक्षाने राजकीय घोडदौडीचा श्रीगणेशा केला आहे .

महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाची घोषणा केल्यानंतर राणेंच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तयार करण्यात आलेल्या ‘समर्थ विकास पॅनल’च्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यात पाच ग्रामपंचायतीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने खाते उघडले आहे. तालुक्यातील 52 पैकी 50 ग्रामपंचायतीत समर्थ विकास पॅनलच्या माध्यमातून उमेदवार उभे केले होते. त्यातील नेतर्डे, कवठणी, तळवणे, कलंबिस्त, वेर्ले आदी पाच ग्रामपंचायतीवर बिनविरोध सरपंच निवडले गेले आहेत .