आदित्य ठाकरेंनी खालील पातळीचा विश्वविक्रम याबद्दल बोलूच नये, कारण…

rane nitesh

मुंबई : ठाकरे सरकार विरोधात भाजपने “मेरा आंगण, मेरा रणांगण” असं म्हणत ‘महाराष्ट्र बचाओ’चा नारा दिला आहे. आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी मुंबईत भाजप कार्यालयाबाहेर काळे झेंडे घेऊन आंदोलन केले.

या भाजपच्या आंदोलनावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. ‘आज एका मोठ्या पक्षाच्या युनिटने खलाच्या पातळीचे राजकारण करून मोठा जागतिक विक्रम केला आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात संपूर्ण जग राजकारण, व्यक्तिगत वाद आणि हेवेदावे विसरून एकमेकांना मदत करत आहे. मात्र हा एक असा पक्ष आहे ज्याने राजकारण करत समाजात भीती, द्वेष, आणि दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हा पक्ष राजकारणासाठी राज्या वर आलेली महामारी विसरला आहे, असे ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं.

याचाच धागा पकडत भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. याबाबत बोलताना राणे म्हणाले, ‘खालील पातळीचा विश्वविक्रम याबद्दल बोलूच नये, कारण त्यांच्या मुख्यमंत्र्यांमुळे… महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या ही न्यूयॉर्कच्या बरोबरीने आहे. जर थोडी लाज असेल तर काहीतरी काम करा आणि आम्हाला या महामारीच्या संकटापासून वाचवा, असे राणेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपने आज संपूर्ण राज्यात ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन पुकारले होते. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात हे राज्य सरकार निष्क्रिय ठरलं असून या सरकारला आता जाग आणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जनतेने आपल्या घराच्या अंगणात उभं राहुन सरकारच्या निष्क्रियते विरोधात काळे झेंडे, कोणत्याही काळ्या वस्त्राने निषेध व्यक्त करावा, असे आवाहन भाजपकडून करण्यात आले होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या आंदोलनावर सडकून टीका केली. तर भाजपनेही आंदोलन करत राज्य सरकारच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले.