‘अन्नदात्या बळीराजाला सर्व संकटांतून मुक्त कर’, मुंडे भगिनींचे योगेश्वरी देवीला साकडे

मुंडे भगिनी

अंबाजोगाई : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त आज अंबाजागाई येथे आदिशक्ती योगेश्वरी मातेचे पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे यांनी दर्शन घेतले. यावेळी पंकजा मुंडे यांनी अन्नदात्या बळीराजाला सर्व संकटांतून मुक्त कर आणि कोरोनाचे संकट टळू दे अशी प्रार्थना आदिशक्ती योगेश्वरी चरणी केली.

नवरात्रोत्सवानिमित्त पंकजा मुंडे व खा.डॉ.प्रितम मुंडे दरवर्षी परंपरेनुसार योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी अंबाजोगाई शहरात आल्या होत्या. सकाळी भगवान बाबा चौकात कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मंदिरात जाऊन त्यांनी आदिशक्ती योगेश्वरी मातेची मनोभावे पूजाअर्चा केली आणि दर्शन घेतले. अन्नदात्या बळीराजाला सर्व संकटातून मुक्त कर आणि कोरोनाचे संकट टळू दे अशी प्रार्थना आदिशक्ती चरणी केली. यावेळी आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, गयाताई कराड , भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे उपस्तीत होते.

राज्य सरकारने ७ ऑक्टोबरपासून घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे खुली करण्याचे आदेश दिले आहेत. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर व बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीच्या मंदिरात तयारी सुरू झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून दोन्ही ठिकाणी उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. यात नवरात्रोत्सवादरम्यान दररोज १५ हजार भाविकांना तुळजाभवानी मातेचे दर्शन घेता येणार आहे, तर अंबाजोगाईत कोरोनाच्या नियमांचे पालन करून सुरक्षिततेचे सर्व उपाय केले जाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या