भाजप आमदार संगीता ठोंबरें विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

blank

टीम महाराष्ट्र देशा: केजच्या भाजप आमदार संगीता ठोंबरे व त्यांचे पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठोंबरे यांच्या विरोधात लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सुतगिरणीच्या संचालक पदावर नेमणूकीसाठी बनावट स्वाक्षऱ्या केल्याची फिर्याद गणपती कांबळे यांच्याकडून न्यायालयात करण्यात आली होती.

संगीता ठोंबरे लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या मुख्य प्रवर्तक आहेत. तर, त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे या सुतगिरणीचे अध्यक्ष आहेत. गणपती सोनाप्पा कांबळे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून संचालक पदावर नियुक्ती केल्याची त्यांची तक्रार आहे. सदर गैरव्यवहारात आमदार श्रीमती ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांनी आपल्या खोट्या स्वाक्षऱ्या करुन शासनाची व जनतेची फसवणूक करून आपणास नाहक गोवण्याचा प्रयत्न केला. असा आरोप कांबळे यांच्याकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. अशामध्ये भाजप आमदाराविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यामुळे भाजपची कोंडी करण्यासाठी विरोधक सरसावले आहेत. तसेच आधीच पक्षांतर्गत गटबाजीने अस्वस्थ असलेल्या आमदार ठोंबरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.