सोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ

सोलापूर- सोलापूर विद्यापीठाचा चौदावा दीक्षांत समारंभ 19 जानेवारी 2019 रोजी सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत मंडपात होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

या दीक्षांत सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून नवी दिल्लीच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत कोकरे यांनी सांगितले. यावेळी डॉ. सहस्त्रबुद्धे हे स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करणार आहेत.

डॉ सहस्त्रबुद्धे हे मूळचे हुबळी, कर्नाटकचे असून ते गेल्या 35 वर्षांपासून अभियांत्रिकी, वैज्ञानिक क्षेत्रात कार्यरत असून शासनाच्या महत्त्वाच्या विविध पदांची जबाबदारी ते यशस्वीपणे सांभाळत आहेत. प्रशासनाचाही दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. प्रख्यात शास्त्रज्ञ व वैज्ञानिक म्हणून ते परिचित आहेत. डॉ. सहस्त्रबुद्धे यांच्या रूपाने एक बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले अतिथी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला लाभणार आहेत.

दीक्षांत सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. सध्या या समित्यांचे काम सुरू असल्याचे चित्र विद्यापीठात पाहावयास मिळत आहे.

You might also like
Comments
Loading...