fbpx

सोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ

सोलापूर- ( प्रतिनिधी ) – सोलापूर विद्यापीठाचा चौदावा दीक्षांत समारंभ 19 जानेवारी 2019 रोजी सकाळी साडेदहा वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत मंडपात होणार असून यावेळी एकूण 12 हजार 856 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. याचबरोबर 131 विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर 54 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या दीक्षांत सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे हे उपस्थित राहणार आहेत. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. सहस्त्रबुद्धे हे स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करणार आहेत. प्रारंभी सकाळी सव्वादहा वाजता प्रशासकीय इमारतीपासून ते दीक्षांत मंडपापर्यंत दीक्षांत मिरवणूक निघणार आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत कोकरे हे ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी असणार आहेत.

या दीक्षांत समारंभात एकूण 12 हजार 856 पैकी पाच हजार 863 विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून तर सहा हजार 993 विद्यार्थ्यांनी अनुपस्थित राहून पदवी स्वीकारणार आहेत. यामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव विज्ञान विद्याशाखा, आंतर विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत कोकरे यांनी सांगितले. 12 हजार 856 पदवी स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 7 हजार 81 मुलांचा तर पाच हजार 775 मुलींचा समावेश आहे.

यंदा तब्बल 131 जणांना पीएच.डी पदवी प्रदान केली जाणार आहे. गतवर्षीच्या तुलनेने या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गतवर्षी 66 जणांना पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली होती. त्याचबरोबर यंदा 54 विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. विविध विषयात गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना देणगीदारांनी दिलेल्या रकमेतून सुवर्णपदक देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. गतवर्षी 50 सुवर्णपदके देण्यात आली होती. यंदा ही संख्या 54 इतकी झाली आहे. गेल्या वर्षभरात चार देणगीदारांची संख्या वाढली आहे.

दीक्षांत सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. सध्या या समित्यांचे काम सुरू असल्याचे चित्र विद्यापीठात पाहावयास मिळत आहे.
या पत्रकार परिषदेस प्र कुलगुरू डॉ. एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. बी. घुटे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत कोकरे, डॉ. रवींद्र चिंचोलकर, उपकुलसचिव डॉ. यु. व्ही. मेटकरी, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे, डॉ. अंबादास भासके आदी उपस्थित होते.