कोळसा खाण घोटाळा प्रकरणी नवीन जिंदल यांच्यासह चौघांना जामीन

नवी दिल्ली : मध्य प्रदेशमधील कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या दिल्लीतील विशेष न्यायालयाने उद्योगपती नवीन जिंदाल यांच्यासह चौघांना जामीन मंजूर केला. विशेष न्या. भरत पराशर यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यासह तेवढ्याच रकमेचा दंड भरून हा जामीन दिला आहे.

या प्रकरणी पुढील सुनावणी ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. जिंदल यांच्याबरोबर `जिंदल स्टील ॲण्ड पॉवर लिमिटेड’चे माजी संचालक सुशील मारू, माजी व्यवस्थापकीय उपसंचालक आनंद गोयल व मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत गुजराल यांचा समावेश आहे.

मध्य प्रदेशमधील उर्तान नॉर्थ कोळसा खाण खरेदीत कंपनीने नियमांचे उल्लंघन करून कोळसा मंत्रालयाची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला. या बरोबरच संबंधितांविरोधात फसवणूक व गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. या संदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाने संबंधितांना समन्स बजावले होते.