कडकनाथ घोटाळा : सांगलीतील कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक

टीम महाराष्ट्र देशा : काडकनाथ कोंबडी घोटाळा चांगलाच चर्चेत आला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हे प्रकरण चांगलेच उचलून धरले आहे. तर कोट्यवधी रुपयांच्या कडकनाथ कोंबडी घोटाळ्याप्रकरणी सांगली इथल्या एका कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सुधीर मोहिते, संदीप मोहिते, हनुमंत जगदाळे आणि प्रीतम माने अशी या चौघांची नावं आहेत.

या प्रकरणी औरंगाबाद, नाशिक, पालघर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुण्यासह अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हा घोटाळा साडे पाचशे कोटी रुपयांचा असून, त्यात राज्यभरातल्या दहा हजार शेतकऱ्यांना फसवण्यात आल्याचा दावा केला आहे. या घोटाळ्याची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही शेट्टी यांनी केली आहे.

दरम्यान कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाच्या आमिषाने महारयत अॅग्रो या कंपनीकडून राज्यभरातील शेतकऱ्यांची 500 कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. ही कंपनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकांची असल्याचं बोललं जातंय. कडकनाथ कोंबडी घोटाळ्याप्रकरणी सदाभाऊ खोत यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत त्यांनी खुलासा करावा, अशी मागणी विरोधक करत आहेत. कडकनाथ कोंबडी घोटाळयावरून शेतकरी नेते राजू शेट्टी आणि कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत आमनेसामने आले आहेत. कडकनाथ घोटाळ्यातील आरोपींना खोत पाठीशी घालत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला होता.