कॉलेजमधील गरबा कार्यक्रमातून चार मुस्लीम व्यक्तींना अटक; बजरंग दलाने घेतला होता आक्षेप

गरबा

इंदोर : गांधीनगर येथील एका खाजगी महाविद्यालयातील गरबा नृत्य कार्यक्रमात उपस्थित राहिल्यामुळे चार मुस्लीम व्यक्तींना कलम १५१ अन्वये अटक करण्यात आली आहे. बजरंग दलाने आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती आहे. प्रत्येकी ५० हजारांचा दंड भरुन या चौघांची सुटका करण्यात आली आहे.

अदनान शाह, मोहम्मद उमर, अब्दुल कादिर, सय्यद साकीब अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. या मुलांच्या पालकांनी अटकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. यावर अदनानचे वडील अब्दुल हमीद शाह पीटीआयशी बोलताना म्हणाले, अदनान त्याच कॉलेजचा बी. कॉमचा दुसऱ्या वर्गातील शिकणारा विद्यार्थी आहे. गरब्याच्या कार्यक्रमासाठी तो स्वयंसेववक म्हणून काम करत होता. त्या दिवशी साऊंड आणि लाईटींग हाताळण्याचे काम त्याच्याकडे देण्यात आले होते. त्यामुळे कोणत्या आधारावर माझ्या मुलावर कलम १५१ दाखल करण्यात आले असा प्रश्न उपस्थित केला आहे.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत चौबे म्हणाले, या मुलांची कार्यक्रमादरम्यान काही मुलांशी बाचाबाची झाली होती. म्हणून केवळ प्रतिबंधात्मक उपाय म्हणून यांना अटक करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गरब्याच्या कार्यक्रमात मुस्लीम व्यक्तींच्या उपस्थितीला आक्षेप घेतला. त्यानंतर पोलीस त्या चौघांना घेऊन गेले. बजरंग दलाचे स्थानिक स्वयंसेवक तरुण देवडा यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे. जिल्हा प्रशासनाने केवळ ८०० जणांना परवानगी दिली असता कार्यक्रमात २ ते ३ हजार जण सहभागी झाले होते आणि तिकीटविक्री करुन या कार्यक्रमाला व्यावसायिकतेकडे वळवण्यात आले. अशी तक्रार देवडा यांनी केली.

पवित्र नवरात्रौत्सवादरम्यान मोठ्या संख्येने मुस्लीम तरुणांना आमंत्रण दिले गेले, कॉलेज त्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. असा आरोपही देवडा यांनी तक्रारीमध्ये केला आहे. विश्वहिंदू परिषदेने सोमवारी रतलाम इथे गरबा कार्यक्रम परिसरात हिंदूंव्यतिरिक्त इतर धर्मीयांना प्रवेश नाही, असे पोस्टर्सही ठिकठिकाणी लावले आहेत.

महत्वाच्या बातम्या