fbpx

शुटिंगसाठी मैदान दिल्याने माजी सिनेट सदस्य नाराज

nagraj manjule vs pune university ground

पुणे:‘एकिकडे विद्यापीठातील कॅन्टीनच्या खाद्यपदार्थांचे आणि रिफेक्ट्रीतील जेवणाचे दर वाढविण्याचे काम सुरू असून दुसरीकडे चित्रपटाच्या शूटिंगसाठी नाममात्र शुल्कात मैदान वापरण्यास देणे सुरू आहे, हे काम विद्यापीठ प्रशासनाला शोभत नाही. समाजातील विविध स्तरातून विद्यापीठ प्रशासनाच्या कारभारावर टिका होत असताना प्रशासनाला मैदान वापरायला देण्याची आवश्यकता तरी काय ?,’ असा सवाल उपस्थित करत  विद्यापीठाच्या माजी सिनेट सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने खेळण्याचे मैदान चित्रपटाच्या शूटिंगसाठी दिल्याचा माजी सिनेट सदस्यांनी निषेध व्यक्त केला असूव मैदान पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. ‘विद्यापीठाचा माजी विद्यार्थी चित्रपट काढत आहे, ही आनंदांची गोष्ट आहे. मात्र, त्यासाठी त्याला नाममात्र शुल्क आकारून विद्यापीठातील सामान्य जागेऐवजी मैदान वापरायला देणे. त्यानंतर अशातच चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेट उभारणारे लोक ‘बाउन्सर’ आणि ‘नो एन्ट्री’च्या पाट्या लावून विद्यार्थ्यांना मैदानात येण्यास मज्जाव करत आहेत. विद्यार्थीकेंद्रीत कारभाराचा गाजावाजा करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाचे हे विसंगत धोरण न पटणारे आहे. त्यामुळे या धोरणाचा आम्ही निषेध करत आहोत. सेट उभारण्यासाठी ‘जेसीबी’ मशीनच्या सहाय्याने मोठे खड्डे केले आहे. तेथे पक्के बांधकाम सुरू आहे. मैदानाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला आहे. त्यामुळे या खोदकामामुळे मैदानाचे मोठे नुकसान होत असून मैदानाच्या स्ट्रक्चरला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ते मैदान पूर्ववत करून घ्यावे,’ असे माजी सिनेट सदस्य दादाभाऊ शिनलकर, संतोष ढोरे, शशिकांत तिगोटे यांनी सांगितले.