fbpx

६ महिने खूप सहन केले पण आता नाही – देवेगौडा

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटक मधील राजकीय सत्ता संघर्ष काही थांबनेचं नाव घेत नाही. इतके दिवस मौन बाळगून असणारे माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे सर्वेसर्वा देवेगौडा यांनी संताप व्यक्त केला आहे. . मागील ६ महिन्यांपासून मी प्रत्येक गोष्ट सहन करत आहे. पण आता मी गप्प बसू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसबरोबरील आघाडीचे दुखणेही सांगितले. कर्नाटकात सत्ता स्थापन केल्यापासून कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएस आघाडीत मतभेद सुरू आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हापासून आमची काँग्रेसबरोबर आघाडी झाली. तेव्हापासून मला त्रास होत आहे. कुमारस्वामी मुख्यमंत्री होऊन ६ महिने झाले आहेत. यादरम्यान अनेक प्रकरणे समोर आली. तरीही मी शांत बसलो. पण आता मी गप्प बसू शकत नाही. आघाडीचे सरकार चालवण्याची ही पद्धत नाही. दररोज सहकारी पक्षाला अभद्र व्यवहार करू नका अशी विनंती करणे योग्य नसल्याचे देवेगौडा म्हणाले आहेत.

कर्नाटक सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस आमदार सी पुट्टरंगा यांनी काही दिवसांपूर्वी आमच्यासाठी अजूनही सिद्धरामय्या मुख्यमंत्री असल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी यावर आक्षेप नोंदवला होता. जर काँग्रेस नेते अशाप्रकराचे वक्तव्ये करत राहिले तर मी राजीनामा देण्यासाठी तयार आहे. ते मर्यादा ओलांडत आहेत. यामुळे त्यांचेच नुकसान होईल. काँग्रेसने आपल्या आमदारांना सांभाळायला हवे, असे म्हटले होते

3 Comments

Click here to post a comment