राजकारणातील भीष्म पितामह काळाच्या पडद्याआड

महाराष्ट्र देशा: भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे, वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, मागील 48 तासांत त्यांची प्रकृती जास्त खालावली होती.

देशाच्या राजकारण एक मितभाषी आणि कणखर नेतृत्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांना ओळखलं जातं. कारगिलची लढाई असो की भारताला अणुअस्त्रधारी देश बनवण्याच्या निर्णय, त्यांनी आंतरराष्ट्रीय विरोध झुगारत देशहिताचे असंख्य निर्णय घेतले होते.

ग्वाल्हेरजवळच्या छोटय़ाशा गावातील मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कानपूरमधून राज्यशास्त्रात एम. ए. केल्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता झाले. राजकारणात सक्रीय राहूनच त्यांनी त्यांच्यातील साहित्यिक आणि पत्रकार जागा ठेवला. राष्ट्रधर्म, वीर-अर्जुन आणि पांचजन्य यासारख्या विविध नियतकालिकांमधून त्यांनी पत्रकारिता केली होती.

श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे ते विश्वासू शिष्य होते. १९५७ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेचे सदस्य बनले.आणीबाणीच्या काळात वाजयेपी यांनी त्यांच्या पक्षाचे विलीनीकरण जनता पार्टीत केले, पण पुढे ती पार्टीही टिकली नाही.संकुचित दृष्टीकोन असलेल्या आपल्या पक्षाला विशाल दृष्टीकोन देण्याचा प्रयत्न केला.इंदिरा गांधी यांना कौतुकाने दुर्गेचा अवतार म्हणणारे वाजपेयी आणीबाणीच्या काळात त्यांचा विरोध करण्यासाठी सर्वात पुढे होते.

वाजपेयी यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात भारतीय जनसंघापासून केली होती. इंदिरा गांधी यांना सत्तेतून बाहेर काढण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. मोरारजी देसाई सरकारमध्ये त्यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

पुढे 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उभारणीत करत, गैरकाँग्रेसी सरकारमधील पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले पंतप्रधानपद झाले. आजवर एकूण 10 टर्म म्हणजेच 40 वर्ष लोकसभा, तर 2 टर्म राज्यसभेवर ते निवडणून आले होते. 2014 मध्ये त्यांना भारतरत्न म्हणून गौरविण्यात आलं आहे.

एक कवी, पत्रकार आणि प्रभावी वक्ता म्हणून वाजपेयी यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती, ‘मेरी इक्यावन कविताये’, हा त्यांच्या गाजलेला कविता संग्रह. त्यांना कवितेचा वारसा त्यांचे वडील कृष्ण बिहारी वाजपेयी यांच्याकडून मिळाला होता. मृत्यु या हत्या, अमर बलिदान, कैदी कविराय की कुण्डलिया, संसद में तीन दशक, अमर आग है, सेक्युलर वाद आदी कविता संग्रह आणि पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं आहे.