fbpx

‘मला जे काही बोलायचं आहे, ते मी नागपुरात बोलेन’ – प्रणव मुखर्जी

टीम महाराष्ट्र देशा : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण स्वीकारल्यानंतर त्यांच्यावर अनेक ठिकाणावरून टीका होत आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्यांना या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे पत्र देखील लिहिले आहेत. मात्र या सगळ्यांवर प्रणव मुखर्जी यांनी आत्तपर्यंत काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

दरम्यान, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी याबद्दल पहिल्यांदा भाष्य केलं. माझ्या संघाच्या कार्यक्रमात जाण्याच्या चर्चांना नागपुरात संघाच्या कार्यक्रमातच उत्तर देईल , असं मुखर्जींनी म्हटलं आहे. ‘मला जे काही बोलायचं आहे, ते मी नागपुरात बोलेन,’ असं मुखर्जी यांनी बंगाली वृत्तपत्र आनंद बाजार पत्रिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. मला अनेकांनी पत्रं पाठवली आहेत. अनेकांचे फोन आले आहेत. मात्र मी कोणालाही उत्तर दिलेलं नाही, असंही ते म्हणाले.

ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश आणि सी. के. जाफर शरीफ यांनी प्रणव मुखर्जींना पत्र लिहून कार्यक्रमात सहभागी होण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे. ‘मुखर्जी यांच्यासारख्या विद्वान आणि धर्मनिरपेक्ष विचारांच्या व्यक्तीनं संघासोबत कोणतीही जवळीक ठेऊ नये,’ अशा आशयाचं पत्र मुखर्जी यांना लिहिल्याची माहिती जयराम रमेश यांनी दिली. संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यास देशातील धर्मनिरपेक्ष वातावरणावर चुकीचा परिणाम होईल, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

1 Comment

Click here to post a comment