मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष अँड. प्रताप बांगर यांचे निधन

अँड. प्रताप बांगर

परभणी : मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जिल्ह्यातील प्रसिद्ध विधिज्ञ प्रताप बांगर यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. ते काही महिन्यांपासून आजारी होते. दरम्यान परभणी येथील जिंतूर रस्त्यावरील वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी एक वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

अँड. बांगर संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठीच्या आंदोलनात अग्रेसर होते. मराठवाडा कृषी विद्यापीठ, अन्य विकासाच्या चळवळीत त्यांनी मोठे योगदान दिले होते. अँड.बांगर यांनी राजकीय क्षेत्रात नेहमी समाजाभिमुख राजकारण केले. जनमानसात तळमळीचा सच्चा, प्रामाणिक नेता आणि कार्यकर्ता म्हणून ते ओळखले जात होते. मराठवाड्यात शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यापैकी एक म्हणून त्यांची ओळख होती.

जिल्ह्यातील विकासाभिमुख चळवळी, सामाजिक क्षेत्रातील उपक्रमात ते अग्रेसर होते. अन्याय, अत्याचारांच्या घटना घडामोडीत ते पेटून उठत. त्यामुळेच त्यांचा सर्व क्षेत्रात मोठा जनसंपर्क होता. यांच्या निधनाने जिल्ह्याची तसेच शहरातील राजकीय, सामाजिक नुकसान झाले,आहे, देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशी भावना खासदार बंडू ( संजय) जाधव यांनी व्यक्त केली आहे. अनेक मान्यवरानी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या