मागील ५ वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक कंपन्या बंद पडल्या – डॉ. मनमोहन सिंग

manmohan sing

टीम महाराष्ट्र देशा;- राज्यातील विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेतली.यावेळी बोलताना ते म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा दाखवणारी मुंबई व महाराष्ट्र गंभीर आर्थिक संकटात आहे. राज्यातील उद्योजकांमध्ये नैराश्य असून गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक कंपन्या बंद पडल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारची लोकविरोधी धोरणे यास जबाबदार आहेत, असा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी भाजप सरकारवर   केला आहे.

यावेळी पुढे बोलताना डॉ. मनमोहन सिंग म्हणाले, काँग्रेसच्या काळात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नेहमीच मदत करण्यात आली. शेतकऱ्यांची कर्जे माफ करून त्यांना दिलासा दिला गेला. मात्र, सध्याच्या सरकारच्या उदासीनतेमुळं आणि आर्थिक मंदीमुळं देशाचं भविष्यच अंधारात गेलंय. दरवाढीवर नियंत्रण राखण्याच्या हट्टाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आयात-निर्यात धोरणालाही झळ बसली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच असून महाराष्ट्र याबाबतीत पहिल्या क्रमांकावर आला आहे, ही दुर्दैवाची बाब आहे,’ असंही ते म्हणाले.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएमसी बँक प्रकरणात लक्ष घालून १६ लाख खातेदारांना दिलासा द्यावा, असं आवाहन सिंग यांनी केलं. ‘पीएमसी बँकेच्या खातेदारांसोबत घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून १६ लाख खातेदारांना सहन कराव्या लागत असलेल्या अडचणी दूर कराव्यात,’ असं सिंग म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारसह रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं या प्रकरणात लक्ष घालून ग्राहकांना न्याय द्यावा, असं आवाहनदेखील त्यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या