रिक्षाचालकांचा विमा काढण्यासाठी माजी खासदार पुत्राने घेतला पुढाकार !

krushnaraj mahadik

कोल्हापूर : भाजप नेते व माजी खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय कार रेसर कृष्णराज महाडिक यांनी एक अभिनव सामाजिक उपक्रम आखला आहे. कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागातील सर्व रिक्षाचालकांना आणि मालकांना, दोन लाख रुपयांचा विमा मोफत उतरवला जाणार आहे. त्यासाठी २६ जानेवारीला एका विशेष शिबिराचे आयोजन केले आहे.

आजवर धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रम यशस्वी झाले आहेत. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून, यावर्षी धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनी पुढाकार घेऊन, एक लोककल्याणकारी उपक्रम आयोजित केला आहे. कावळा नाका येथील नवभारत ट्रेडिंग कंपनी या पेट्रोल पंपावर, मंगळवार २६ जानेवारी २०२१ रोजी या विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे.

कोरोना काळात जवळपास सहा महिने संपूर्ण रिक्षा व्यवसाय बंद होता. अजूनही या व्यवसायाची पूर्ण घडी बसलेली नाही. त्यामुळे अनेक रिक्षाचालक-मालक आर्थिक दृष्ट्या प्रचंड अडचणीत आले आहेत. रिक्षा व्यावसायिकांच्या व्यथा आणि वेदना जाणून घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी, कृष्णराज महाडिक यांनी हा उपक्रम आयोजित केला आहे. त्यानुसार कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागातील तीन आसनी रिक्षा आणि आपे रिक्षा चालकांसाठी दोन लाख रुपयांचा मोफत विमा उतरवला जाणार आहे.

ज्या रिक्षाचालक-मालकांचे बँकेमध्ये खाते असेल, त्यांनी २६ जानेवारीला शिबिरात येताना, पासबुक घेऊन यावे आणि जर बँकेत खाते नसेल, तर आधार कार्ड, रेशनकार्ड, पॅन कार्ड आणि दोन फोटो घेऊन आल्यास, तात्काळ त्यांचा विमा उतरवून दिला जाईल. २६ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत हे मोफत विमा शिबिर आयोजित केले असून, सामाजिक भावनेतून हा उपक्रम आयोजित केला आहे. दोन लाख रुपयांचा विमा उतरवण्यासाठी, रिक्षा व्यवसायिकांना स्वतःच्या खिशातून एकही रुपया भरावा लागणार नाही. तरी या उपक्रमाचा जास्तीत जास्त रिक्षा व्यवसायिक बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृष्णराज महाडिक यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP