शरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील उर्फ तात्या यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अवघा जिल्हा शोकसागरात बुडाला. या लाडक्या नेत्यासाठी वाई तालुक्यासह संपूर्ण जिल्हा हळहळत आहे. लक्ष्मणराव पाटील गेली काही वर्षे पार्किनसन्स या दुर्धर आजाराने त्रस्त होते. सातार्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला नेण्यात आले होते.

यांचे तीनही सुपूत्र मिलिंद पाटील, आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांनी त्यांच्यावरच्या उपचारात कोणतीही कसूर ठेवली नव्हती. कार्यकर्त्यांनीही लक्ष्मणतात्यांच्या प्रकृतीसाठी ईश्वराकडे प्रार्थना सुरू केली होती. मात्र गुरुवारी अखेर लक्ष्मणराव पाटील यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सातारा, वाई तालुक्यासह अवघ्या जिल्ह्यावर शोककळा पसरली.

लक्ष्मणतात्यांचा जीवनपट थक्क करणारा राहिला. १९६० साली ते बोपेगावचे सरपंच झाले. वाई पंचायत समिती सभापती म्हणून आपले कर्तृत्व सिध्द करत १० वर्षे यशस्वीपणे काम केले. सन १९८० साली लक्ष्मणतात्या झेडपीवर निवडून गेले होते. त्यांनी सलग ११ वर्षे जिल्हा परिषदेचा गाडा समर्थपणे हाकला होता. सन १९९९ साली ना. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी जिल्ह्यात सर्वात प्रथम तात्यांनीच राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतला होता. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले जिल्हाध्यक्ष झाले.