fbpx

भाजप राष्ट्रवादीला बीड जिल्ह्यात आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत

बीड: सुरेश धस यांना आपल्या गोटात सामील करून घेतल्यानंतर भाजप राष्ट्रवादीला बीड जिल्ह्यात आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे .धस यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आज उपस्थिती लावली. मुख्यमंत्री आज बीड दौ-यावर आहेत .बीडमधील एका कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसोबत जयदत्त क्षीरसागर हे सुद्धा होते. पंकजा मुंडे, गिरीष महाजन, आ. पाशा पटेल, विनायक मेटे यांची उपस्थिती होती.

क्षीरसागर यांच्या भाजपप्रवेशाच्या शक्यतेमुळे राष्ट्रवादी चांगलीच अस्वस्थ झाली असून मुख्यमंत्र्यांनी कोणाच्या घरी भेटायला जावे आणि कोणाच्या घरी जावू नये हा त्यांचा स्वतःचा अधिकार आहे, मात्र ज्या बीड जिल्ह्यात मागील १० महिन्यात सर्वाधिक शेतक-यांच्या ( १६१ ) आत्महत्या झाल्या आहेत त्यापैकी एखाद्या शेतकरी कुटुंबियांच्या घरी मुख्यमंत्री सांत्वन करायला गेले असते तर अधिक बरे झाले असते अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे.बीड येथे मुख्यमंत्री यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.