मराठवाडा विकास मंडळाच्या मुद्यावरून माजी तज्ज्ञ सदस्याची कळकळीची विनंती; पवार, मुख्यमंत्री आणि पटोले यांना लिहिले पत्र

औरंगाबाद : मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या वैधानिक विकास महामंडळाला मुदतवाढ देण्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने आडमुठे धोरण अवलंबले आहे. राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नावे जाहीर होत नाही, तो पर्यंत आम्ही ही मुदतवाढ देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. यावरून विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्नही केलाय. मात्र, या सर्वात मराठवाडा आणि विदर्भावर मात्र, अन्याय होतोय. त्यामुळे मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. अशोक बेलखोडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोळे यांना पत्र लिहिले आहे.

डॉ. बेलखोडे यांनी लिहिले की, विधानभवनात झालेली खडाजंगी जी माझ्यासारख्याच्या कल्पनेतही नव्हते. पण बरे झाले, विषय ऐरणीवर आला. राजकीय पक्षांना ही मंडळे नकोशी वाटणे एका बाजूने सहाजीक असले तरी विकासातील विषमता व विकासाबद्दलची मागणी मांडण्याचे ते एक संवैधानिक व्यासपीठ आहे हे नाकारून चालत नाही. त्यामुळे ती अस्तित्वात ठेवणे सध्या तरी योग्य आहे. राहिला प्रश्न त्यावरील नेमणूकांचा – अध्यक्षपदाच्या ठिकाणी एखाद्या नेत्याची वर्णी लावणे हे ही समजण्यासारखे आहे. पण त्या बाबतीतही विकासाचा समग्र विचार व क्षमता याचा विचार होणे गरजेचे आहे. सद्यपरिस्थीतीत तीन पक्षांनी तीन मंडळे आपापल्या जवळच्या लोकांची नियुक्ती केल्यास हा प्रश्न मार्गी लागेल कारण या पदाला मंत्रीपदाचा दर्जा आहे.’

इतकेच नाही तर त्यांनी सद्यस्थितीत असलेल्या सदस्यांबाबत लिहिले की, अस्तित्वात असलेल्या सदस्यांपैकी अगदी राजकीय शिक्का असलेले कोणी नव्हतेच. ब्रायन लोबो, डॉ. रवि कोल्हे, किशोर मोघे, डॉ. अशोक बेलखोडे, ही सामाजिक कार्यकर्ते मंडळी आणि डॉ. आनंद बंग, मुकुंद कुलकर्णी, शंकरराव नागरे, बी.बी. ठोंबरे इत्यादी सर्व नावे त्या त्या क्षेत्रातील अतिउत्तम कामगीरी केलेले तज्ञ लोक आहेत.’ या सर्व परिस्थितीत राजकीय संघर्ष टाळून हेच सदस्य पुढे सुरू ठेवण्याची विनंतीही डॉ. बेलखोडे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या