माजी नगरसेवकाने वॉर्ड अधिकाऱ्यांनाच कोंडले!

औरंगाबाद : आमचा कचऱ्याचा प्रश्न सोडवा म्हणत माजी नगरसेवक दामू अण्णा शिंदे यांनी ठाकरे नगर प्रभागातील अधिकारी मीरा चव्हाण यांना त्यांचाच कार्यालयात कोंडल्याची घटना समोर आली आहे. रेड्डी कंपनीचे मालक गोपीनाथ रेड्डी यांच्याशी बोलणे करुन दिल्यानंतर, तसेच कचऱ्यासंदर्भात वॉर्डातील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतरच कडी उघडून वॉर्ड अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांना सोडण्यात आले. मात्र हा प्रकार चूकीचा असून याबाबत आपण वरिष्ठांना तक्रार करणार असल्याचे वॉर्ड अधिकारी मीरा चव्हाण यांनी सांगितले.

ठाकरे नगर वॉर्डात नियमित कचरा उचलला जात नाही. तसेच अनेक गल्ल्यांमध्ये गाडी येत नाही. कचरा न उचलूनही जास्तीचा कचरा दाखवला जातो. या भागात असलेल्या एकविरा हॉस्पिटल मध्ये बायोवेस्ट कचरा उचलण्यासाठी रुग्णालयाकडून रेड्डीचे कचरा कर्मचारी पैसे मागत असल्याचा आरोपही यावेळी माजी नगरसेवक दामू अण्णा शिंदे यांनी केला आहे.

आपल्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी शिंदेसह, माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप, शाहू चित्ते वॉर्ड कार्यालयात पोहोचले. गेल्या दोन महिन्यांपासून यासंदर्भात महानगरपालिका तसेच वॉर्ड अधिकार्‍यांकडे निवेदन तक्रारी यांचा खच पडला आहे. मात्र तरीही आपल्या समस्या सोडवल्या जात नसल्यामुळे चक्क आज माजी नगरसेवकाने वॉर्ड अधिकाऱ्यांनाच कार्यालयात कोंडून टाकले. जेव्हा समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. त्यानंतरच कार्यालयाचे कुलुप उघडण्यात आले.

गेल्या १ वर्षाहून अधिक कालावधीपासून ठाकरे नगर वॉर्डात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. सुरुवातीला ९ गाड्या कचरा संकलनासाठी येत असत. मात्र सध्या केवळ तीन गाड्या येत असल्यामुळे डोअर टू डोअर कचरा संकलन होतांना दिसत नाही. या संदर्भात आपण वेळोवेळी याबाबत मनपाकडे पाठपुरावा केल्याचे शिंदे यांनी सांगितले. मात्र मनपातील अधिकारी रेड्डी कंपनीला पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या बातम्या