fbpx

राणेंच्या भाजपप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित

माजी मुख्यमंत्री नारायण राणे

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समर्थकांनी राणेंच्या भाजप प्रवेशाला पाठिंबा व्यक्त केला आहे. राणे समर्थकांना भाजपमध्ये कोणते स्थान मिळेल, हे अद्याप निश्‍चित झालेले नाही. मात्र राणे भाजपमध्ये गेल्यानंतर वर्षानुवर्षे काँग्रेसचे काम करणार्‍या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा उभारी मिळण्याची शक्यता आहे.

राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले, तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे समर्थक काँग्रेसमध्ये दाखल झाले. जिल्ह्याची काँग्रेस राणेंच्या इशार्‍यावर चालू लागली. काँग्रेसच्या काही जुन्या लोकांनीही राणेंचे नेतृत्व स्वीकारले. मात्र काही जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून नव्या कार्यकर्त्यांना पदे दिली गेली. त्यातून जुना-नवा वादही निर्माण झाला. अनेक जुन्या आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांना तत्कालीन खासदार नीलेश राणे यांच्याकडून मानहानीकारक वागणूकही मिळाली. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांनी संघटनेपासून बाजूला राहण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, काँग्रेसमध्ये राणेंचे महत्त्व वाढू नये यासाठी प्रयत्न सुरू झाले. तत्कालीन जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांना प्रदेश कार्यकारिणीवर घेण्यात आले. त्यानंतर चिपळूणचे राणे समर्थक मंगेश शिंदे यांचे नाव जिल्हाध्यक्षपदासाठी सुचविण्यात आले होते. ते माजी खासदार नीलेश राणेंनी सुचविले म्हणून शिंदेंच्या नावावर प्रदेश कार्यकारिणीकडून फुली मारण्यात आली. राज्य पातळीवरही राणेंचे महत्त्व कमी होऊ लागले.

त्यानंतर आता श्री. राणे काँग्रेसमधून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई यांचे समर्थक कार्यकर्ते पुन्हा काँग्रेसची सूत्रे हाती घेण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाप्रभारी म्हणून विश्‍वनाथ पाटील यांची नेमणूक करून तसा संदेशच देण्यात आला आहे. राणे यांचा भाजप प्रवेश निश्‍चित झाल्याचे वृत्त आल्यानंतर त्यांच्या प्रवेशानंतर नेमके काय काय घडेल? काँग्रेसमध्ये कोण राहील? सध्याच्या काँग्रेसमधील कोण कोण त्यांच्यासोबत जातील? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या आशा मात्र पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.