यातून शरद पवारांची कमकुवत व स्वार्थी मानसिकता दिसते-श्रीहरी अणे

श्रीहरी अणे यांचा शरद पवारांना सणसणीत टोला

टीम महाराष्ट्र देशा: विदर्भाबाबत हिंदी-मराठी भाषिकांच्या वर्चस्वाचा वाद हा खोडसाळ व पद्धतशीर गैरप्रसार करणारा आहे. विदर्भाचं राज्य झाल्यास त्याचा मुख्यमंत्री हिंदी भाषिक असेल की मराठी भाषिक, ही भीती फक्त विदर्भाचं राजकारण करणाऱ्या राजकारण्यांना वाटत असेल. तशी भीती त्यांची कमकुवत व स्वार्थी मानसिकता दर्शविते. विदर्भ राज्याची मागणी ही भाषावादावर आधारित नाही. महाराष्ट्राचा एकही ‘मराठी भाषिक’ मुख्यमंत्री विदर्भाचा विकास करु शकला नाही, म्हणून आम्हाला स्वतंत्र विदर्भ राज्य हवे आहे, असा सणसणीत टोला राज्याचे माजी महाधिवक्ता आणि स्वतंत्र विदर्भाचे समर्थन करणारे श्रीहरी अणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना लगावला आहे.

वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, मारोतराव कन्नमवार आणि देवेंद्र फडणवीस इतके मुख्यमंत्री विदर्भातून महाराष्ट्राला लाभल्यानंतरही स्वतंत्र विदर्भाची मागणी का होते, असा प्रश्न बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांना एका मुलाखतीत विचारला होता. विदर्भाचा भाग एकेकाळी मध्य भारताचा भाग होता, त्या राज्याची भाषा हिंदी होती, त्यामुळे हा परिसर हिंदी भाषकांचा होता. विदर्भात आजही हिंदी भाषिक आहेत. प्रामुख्याने याच भागातून, हिंदीबद्दल आस्था असणारे स्वतंत्र विदर्भाची मागणी करत आहेत, पण तेथील सामान्य माणसाला वेगळा विदर्भ नकोय, असं उत्तर पवारांनी दिलं होत.

दरम्यान , १९६० ते २०१४ पर्यंत महाराष्ट्राचा एकही ‘मराठीभाषिक’ मुख्यमंत्री विदर्भाचा विकास करू शकला नाही, म्हणून आम्हाला विदर्भाचं राज्य हवे आहे.’ असही श्रीहरी अणे म्हणाले आहेत.