उमेदवाराला विसरा, मोदी आणि भाजपच्या नावाने लोकांकडे मतं मागा – शहा

amit shaha

टीम महाराष्ट्र देशा- इथे पक्षाचा कोण उमेदवार उभा आहे हे विसरून जा, त्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नावाने लोकांकडे मतं मागा अशा स्पष्ट सूचना भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या कर्नाटकातील कार्यकर्त्यांना केल्या आहेत. दरम्यान, यावेळी शहा यांच्याकडून सोशल मीडियाबाबतची निवडणूक रणनितीदेखील अंतिम करण्यात आली.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, कर्नाटकात एकूण ५६ हजार निवडणूक केंद्रे आहेत. कर्नाटकात एकूण ४९० लाख मतदार असून प्रत्येक केंद्रावर किमान १२०० मतं आहेत. बी. एस. येडीयुरप्पा हे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. काँग्रेसकडून राज्याची सत्ता खेचून आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत. यापूर्वी येडीयुरप्पा यांनी कर्नाटकात पहिल्यांदा भाजपचे सरकार स्थापन केले होते. दक्षिणेत पुन्हा सत्ता आणण्यासाठी भाजपने जोर लावला असून, शहा यांचा नुकताच दोन दिवसीय कर्नाटक दौरा पार पडला. यावेळी त्यांनी दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील बंटवाल येथील मतदान केंद्रांवरील कार्यकर्त्यांना संबोधित केले.

नेमकं काय म्हणाले भाजपा अध्यक्ष

उमेदवाराला विसरुन जा, तुम्ही फक्त कमळाच्या चिन्हाकडे आणि मोदींच्या फोटोकडे लक्ष द्या. तुमचे काम हे केवळ विधानसभा मतदारसंघ निवडून आणणे हेच असणार नाही तर तुमच्या केंद्रावरही विजय मिळवणे असणार आहे. ज्यावेळी अशा प्रकारचे अनेक केंद्र तुम्ही जिंकून आणाल तेव्हाच आपण निवडणूक जिंकू, असा धडा यावेळी शहा यांनी कार्यकर्त्यांना दिला.