‘या’ कारणामुळे मी फडणवीसांना माझा नेता मानत नाही; पंकजा मुंडेंचा खुलासा

pankaja munde

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. मुंबईत अलीकडंच झालेल्या समर्थकांच्या मेळाव्यात त्यांनी ही चर्चा फेटाळली व समर्थकांची समजूत घातली. त्यांनी दिलेले राजीनामे नामंजूर करत पंकजा यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा हे आपले नेते असल्याचं सांगितलं.

मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख न केल्यानं अनेकांच्या मनात शंका उपस्थित झाली. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा रोष केंद्रावर नव्हे तर फडणवीसांवर असल्यांच्या नव्याने चर्चा सुरू झाल्या. याची सारवासारव करताना राज्यातील भाजप नेत्यांना पुन्हा एकदा सावध भूमिका घ्यावी लागली. पण आता पंकजा मुंडे यांनी या प्रकरणावर थेट भाष्य केले आहे. दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘२०१४ पूर्वी फडणवीस आणि मी राजकीय पटलावर एकत्र काम केल्याने आम्ही सहकारी आहोत. मुख्यमंत्री म्हणून ते माझे बॉस होते. विधिमंडळाच्या कामकाजात मी त्यांना मानते. पण, राजकारणात माझे नेते राष्ट्रीय स्तरावरील आहेत. कारण मी राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांच्या टीममध्ये काम करते. मध्य प्रदेशची सहप्रभारी म्हणून पक्षाने मला जबाबदारी दिली आहे. कोणत्याही राष्ट्रीय नेत्याने माझ्यावर टीका केलेली नाही. केंद्रीय मंत्रिपदाचा विषय राष्ट्रीय नेतृत्वाने घेतला. त्यासंदर्भाने ते माझे नेते आहेत व त्यांचा निर्णय मला मान्य आहे’, असे मी म्हणाले होते असा खुलासा त्यांनी केला आहे.

पक्षांतर्गत विरोधकांना दिली होती कौरवाची उपमा

मुंबईत समर्थकांची समजूत घालताना पंकजा यांनी महाभारतातील कौरव-पांडवांचं उदाहरण दिले होते. ‘पांडवांवरही अन्याय झाला होता, पण तरीही ते जिंकले. शिवाय, त्यांनीच युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला. जो चांगला असतो, तो लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून प्रयत्न करतो. माझीही तीच भूमिका आहे. कौरवांच्या सेनेतील अनेक लोक मनानं पांडवांच्या सोबत होते. फक्त शरीरानं कौरवांच्या सोबत होते हे विसरू नका,’ असं म्हणत, पंकजांनी अप्रत्यक्षपणे पक्षातील विरोधकांवर निशाणा साधला. मात्र, हे करताना त्यांनी कोणाचंही थेट नाव घेतले नव्हते.

महत्त्वाच्या बातम्या

IMP