मुंबई : युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना घोषित करण्यात आला. महाराष्ट्राच्या सोलापूर मधील रणजितसिंह डिसले यांच्या नावाची शिक्षण क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अशी ओळख असणाऱ्या मानाच्या ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी घोषणा झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अशातच, महाराष्ट्रासह भारताचीही मान उंचावणारे डिसले गुरुजी आता ‘कौन बनेगा करोडपती’च्या कर्मवीर एपिसोडमध्ये झळकणार आहेत. कौन बनेगा करोडपती कर्मवीर मध्ये आपल्या कर्तृत्वाने समाजासाठी वा देशासाठी अमूल्य काम करणाऱ्या व्यक्ती एका खास कारणाच्या पुरस्कारार्थ खेळण्यासाठी दाखल होत असतात.
डिसले गुरुजी देखील अशाच एका खास कारणासाठी या मंचावर येणार आहेत. या खेळात उषा खरे या त्यांच्यासोबत सहभागी होतील. त्या मुलींना चांगली सुरक्षा कशी पुरवता येईल आणि त्यांना आपल्या पायावर कसे उभे करता येईल यावर काम करतात. डिसले गुरुजी तंत्रज्ञानावर भर देऊन शिक्षणपद्धती कशी सुधारली जाईल यावर काम करतात. नुकताच सोनीने या भागाचा प्रोमो प्रदर्शित केला आहे.
उषा खरे आणि रणजित डिसले यांच्यासोबत कौन बनेगा करोडपतीच्या कर्मवीर एपिसोडमध्ये अभिनेता बोमन ईरानी देखील येणार आहेत. ते दोघांना चांगले पैसे जिंकण्यास मदत करतील. दरम्यान, 2017 मध्ये उषा खरे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ‘जेंव्हा एक मुलगी शिकते त्यावेळी फक्त दोन घर बदलत नाहीत तर त्यांचा आसपासचे घर देखील बदलतात.’ असं त्या या प्रोमोमध्ये म्हणाल्या आहेत. तर, ‘ शिक्षणात तंत्रज्ञान आणण्याची गरज असल्याचं’ डिसले गुरुजी म्हणाले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ‘ज्ञानाचा संदेश प्रत्येक घरात पोहोचविला आणि शिक्षणाने संपूर्ण देश बदलला. कर्मवीर रणजित आणि उषाची कहाणी जाणून घ्या. शुक्रवारी रात्री 9 वाजता’ अशी माहिती देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कंगनाच ट्विटर अकाऊंट बंद करण्यासाठी थेट उच्च न्यायालयात याचिका, तर राज्य सरकारचा विरोध
- …तर जानेवारीमध्येच महाराष्ट्रात कोरोना लसीकरण सुरु करू : आरोग्यमंत्री राजेश टोपे
- रयतच्या बड्या अधिकाऱ्याचा पुण्यात राजीनामा; परिस्थिती हाताळण्यासाठी शरद पवार थेट साताऱ्यात
- महाविकास आघाडीत तणाव वाढणार? काँग्रेस नेत्याने दिला स्वबळावर लढण्याचा नारा
- केजरीवालांनी दिल्ली विधानसभेत कृषी कायद्यांच्या प्रतिचे केले तुकडे-तुकडे