श्रेयवादासाठी सेना-भाजपचे कार्यकर्ते भिडले

टीम महाराष्ट्र देशा : प्रभाकर पणशीकर नाट्यगृह, टोपीवाला मंडई तसेच निवासी संकुलासह संयुक्त प्रकल्पाचे भूमिपूजन आज सकाळी ११ वाजता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमावेळी भाजपचे कार्यकर्ते पक्षाचे झेंडे घेऊन हजर होते. दरम्यान शिवसैनिकांची प्रचंड संख्या आणि घोषणांच्या जयघोषाने भाजपचा श्रेयवादाचा डाव उधळला. अखेर भूमिपूजन कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला.

शिवसेनेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या भागात नाट्यगृह आणि मंडई उभी राहत आहे. आज येथे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे दणक्यात आगमन झाले. यावेळी भाजपचे ही कार्यकर्ते दोन्ही बाजूने घोषणाबाजी करत होते. मात्र ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा विजय असो’, ‘जय शिवाजी जय भवानी’, अशा घोषणा शिवसैनिकांनी यावेळी दिल्या. आणि भूमिपूजन कार्यक्रम कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडला. पोलिसांनी देखील यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.

या प्रकल्पात ८०० आसनांचे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे नाट्यगृह, सुमारे २१० विक्री गाळ्यांसह मंडई आणि बहुमजली निवासी इमारतीत ५३ सदनिका बांधल्या जाणार आहेत. सुमारे १२२ कोटी रुपयांच्या खर्चाला महापालिकेने मंजुरी दिली आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मागील २५ वर्षे स्थानिक आमदार या नात्याने याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा केला. आणि या पाठपुराव्याला यश आले. आपल्या दमदार अभिनयाने मराठी रंगभूमी गाजवणारे आणि दर्जेदार नाट्यनिर्मिती करणारे दिवंगत अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महापालिकेने याआधीच मंजूर केला आहे.

मराठा आरक्षणासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन, आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेणार ?