पहिल्यांदाच नीट परीक्षा एकूण दीडशे शहरांमध्ये पार पडणार

महाराष्ट्रातील सहा नव्या केंद्रांचा समावेश

नवी दिल्ली: पहिल्यांदाच नीट परीक्षा एकूण दीडशे शहरांमध्ये पार पडणार. यावर्षी परीक्षेसाठी ४३ नव्या केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. नीट परीक्षा एकूण दीडशे शहरांमध्ये होणार असून यामध्ये महाराष्ट्रातील सहा नव्या केंद्रांचा समावेश आहे. नीटसाठी राज्यात आतापर्यंत मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, अमरावती, सातारा आणि कोल्हापूर ही दहा केंद्रं होती. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण केंद्रांची संख्या १६ वर पोहचली आहे.

सुरुवातीला नीट परीक्षा राज्यात फक्त सहाच केंद्रांवर घेतली जात होती. विद्यार्थ्यांनी ओरड केल्यानंतर गेल्या वर्षी मार्च महिन्यात चार केंद्रं वाढवण्यात आली. मराठवाड्यातील फक्त औरंगाबाद हे एकच केंद्र असल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात होती. आता बीड आणि लातूरची भर त्यात पडली आहे.

आतापर्यंत देशातील १०७ सेंटर्सवर नीटची परीक्षा घेतली जात असे. यावेळी महाराष्ट्रातील सहा केंद्रांसह ४३ केंद्रांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई उपनगर, बीड, बुलडाणा, जळगाव, लातूर आणि सोलापूरचा समावेश आहे. मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यांसदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली. नीट २०१८ परीक्षा रविवारी ६ मे रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.

नीट परीक्षेच्या नोंदणीसाठी आवश्यक माहिती

नीटची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना www.cbseneet.nic.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरता येईल. १४०० रुपये प्रवेश शुल्क (एससी, एसटी उमेदवारांसाठी ७५० रुपये) आकारण्यात येईल. डेबिट/क्रेडीट कार्ड, यूपीआय किंवा नेटबँकिंगद्वारे हे पेमेंट करता येईल. उमेदवार १७ ते २५ वर्ष वयोगटातील असावा. एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा ३० वर्ष आहे. बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थीही नीटसाठी नोंदणी करु शकतात.

परीक्षार्थींना त्यांचा आधार कार्ड क्रमांक देणं बंधनकारक आहे. जर आधार कार्डमधील माहितीत साधर्म्य आढळलं नाही, तर विद्यार्थ्यांना नीट परीक्षेसाठीचा फॉर्म भरता येणार नाही.

You might also like
Comments
Loading...