देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधकांच्या निषेधार्थ पंतप्रधान बसणार उपोषणाला

नवी दिल्ली: देशाच्या इतिहासात पंतप्रधान उपोषणाला बसण्याची पहिलीच घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपोषणाला बसणार आहेत. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांनी गोंधळ घालून वाया घालवले, याचा निषेध नोंदवण्यासाठी १२ एप्रिलला नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा उपोषण करणार आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र पाच मार्चला चर्चेविनाच संपलं. त्यामुळे सरकार आणि विरोधक यांनी एकमेकांना दोष दिला. काँग्रेसने बँक घोटाळ्यावरुन पहिले पाच दिवस कामकाज होऊ दिलं नाही. त्यानंतर वायएसआर काँग्रेस आणि टीडीपीने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत, सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. याव्यतिरिक्त काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सीपीएमनेही कामकाज ठप्प केलं होतं. त्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजप खासदार एक दिवसाचं उपोषण करणार आहेत.