देशात प्रथमच गतिमंद मुलांच्या राष्ट्रीय पोहण्याच्या स्पर्धांचे आयोजन

पिंपरी – रोटरी क्लब ऑफ चिंचवड, रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवड आणि स्पेशल ऑलम्पिक भारत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने भारतामध्ये प्रथमच स्वमग्न व गतिमंद मुलांच्या राष्ट्रीय स्तरावरील पोहण्याच्या स्पर्धांचे आयोजन होत आहे. या स्पर्धा शनिवार (दि. 25) आणि रविवार (दि. 26) रोजी श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाडी येथे होणार आहेत.

स्पर्धेचा उदघाटन समारंभ शनिवारी सकाळी 10 वाजता होणार असून उदघाटन समारंभासाठी मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप उपस्थित राहणार आहेत. देशात प्रथमच स्वमग्न व गतिमंद मुलांच्या राष्ट्रीय स्तरावरील पोहण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, राजस्थान, आसाम, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि भारताच्या अन्य भागातून सुमारे 325 स्वमग्न व गतिमंद मुले सहभाग घेणार आहेत. सर्व स्पर्धकांची राहण्यसह सर्व सोय आयोजकांकडून करण्यात आली आहे.

शनिवारी सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा आणि दुपारी अडीच ते रात्री साडेसात या वेळेत पोहण्याच्या स्पर्धा होणार आहेत. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता उपस्थितांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. रविवारी सकाळी साडेसात ते दुपारी बारा या वेळेत स्पर्धा होणार आहेत. तर दुपारी दोन ते चार या वेळेत पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे. सर्वसाधारण मुलांचे खेळ पाहण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुडुंब गर्दी झालेली सर्रास पाहायला मिळते. त्याचप्रमाणे स्वमग्न व गतिमंद मुलांना देखील प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.