गणपती विसर्जन करताना कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

गणपती

लातूर – जिल्हयात उदगीर येथे 7 दिवसाचे श्री चे विसर्जन आज दिनांक 16 सप्टेंबर 2021 रोजी व लातूर येथील 10 दिवसाचे श्री चे विसर्जन दिनांक 19 सप्टेंबर 2021 रोजी होत असून गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने covid-19 ची सद्यस्थिती पाहता श्री चे विसर्जन करीत असताना कोविड प्रतिबंधात्मक नियम शासनाने घालून दिलेले आहेत. त्या नियमाचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, महानगर पालिकाआयुक्त अमन मित्तल उपस्थित आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी सार्वजनिकपणे स्थापना केलेल्या गणेश विसर्जनासाठी 4 पेक्षा जास्त लोकांनी जाऊ नये. घरगुती गणेश विसर्जन करताना फक्त 2 लोकांनीच विसर्जनाच्या ठिकाणी जावे किंवा घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन घरातच करावे. कुठल्याही प्रकारच्या मिरवणुकीला प्रशासनाने परवानगी दिलेली नाही.

उदगीर किंवा लातूरमध्ये गणेश विसर्जन करीत असताना नगरपालिका ,महानगरपालिका यांनी निर्देशित केलेल्या ठिकाणीच गणेश विसर्जन करावे. गणेश विसर्जनाच्या वेळी पाण्याचा अपव्यय होणार नाही, अशा प्रकारे गणेश विसर्जन करावे. महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या संकलन केंद्रावर गणेश मुर्ती दान करून गणेश विसर्जन करावे. किंवा ज्या कारागिराने मूर्ती बनविलेली आहे त्यांच्याकडेच मूर्ती सुपूर्द करावी. कोणत्याही परिस्थितीत थेट पाण्यामध्ये विसर्जन करू नये. संकलन केंद्रावर उपस्थित कर्मचारी यांना मूर्ती देण्यात यावी. तसेच पर्यावरणाचा व covid-19 च्या नियमांचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. ग्रामीण भागामध्ये लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षितेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे.असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. आणि जिल्हा पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या