दाट धुक्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

मध्य रेल्वे

मुंबई : मुंबईत सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली असून याचा परिणाम आज पहाटेपासून मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर दिसून आला होता. धुक्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत होती. कर्जत ते बदलापूर-कल्याण आणि डोंबिवलीपासून ठाणे ते मुंबईपर्यंत आजपासून दाट धुके पसरले होते. त्याचाच परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला.

मध्य रेल्वेवरील धीम्या आणि जलद मार्गावरील लोकलगाड्या पहाटेपासूनच उशिराने धावत होत्या. या दाट धुक्यामुळे लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत असल्याच्या घोषणा रेल्वे स्थानकांवर केल्या जात होत्या. लोकल उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशी संतप्त झाले होते. त्यात लांब पल्ल्याची रेल्वे पुढे सोडल्याने प्रवाशांचा संतापाचा उद्रेक झाला होता.