दुर्लक्षित आकांक्षित जिल्ह्यांवर भर द्या, अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांची बँकांना सूचना

Bhagwat Karad

औरंगाबाद : वित्तीय समावेशनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या आकांक्षित जिल्ह्यांवर भर द्यावा अशा सूचना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी बँकांना दिल्या आहेत. औरंगाबाद शहरात आयोजित राष्ट्रीय बँक परीषद-‘मंथन’ या एकदिवसीय चर्चासत्रात त्यांनी मार्गदर्शन केले. आतापर्यंत ४३ कोटीहून अधिक बँक खाते सुरू झाली असून जवळपास ८० ते ९० टक्के लोकांची बँक खाते सुरू करण्याचे काम पूर्ण झाले आहे, केवळ आकांक्षित जिल्ह्यांमध्ये हे काम बाकी असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.

प्रधानमंत्री जनधन योजना सुरू झाल्यानंतर देशातील अनेक व्यक्तींनी वयाची १८ वर्ष पुर्ण केली आहेत, त्यांची खाती सुरू करण्याचे बँकांना आवाहन डॉ. कराड यांनी केले. प्रारंभी दीप प्रज्वलन करून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. मल्लिकार्जुन राव यांनी प्रास्ताविक केले.

डॉ. कराड हे केंद्रात अर्थ राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मराठवाड्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेमुळे औरंगाबाद आणि मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल असा दावाही डॉ. कराड यांनी केला आहे. तसेच शहरात उद्योग व्यवसायाला चालना मिळण्यासाठी आणि गुंतवणूक वाढीच्या दृष्ट्रीने ही परिषद महत्त्वाची मानली जात आहे.

या परीषदेला केंद्रीय अर्थ खात्याचे सहसचिव बी. के. सिन्हा, इंडियन बँक असोसिएशनचे अध्यक्ष राजकिरण रॉय, भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष दिनेश खरा, निती आयोगाच्या वरिष्ठ सल्लागार ॲना रॉय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक हेमंत टमटा आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या