नेपाळमधील भूस्खलनामधील मृतांच्या संख्येत वाढ, ३५ भारतीयांना वाचवण्यात यश

काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या पूर व भूस्खलनामधील मृतांच्या संख्येत वाढ होऊन ही संख्या ८० वर पोहोचली आहे. येथे अडकलेल्या २०० भारतीयांपैकी ३५ जणांना वाचविण्यात यश आले आहे. चितवन राष्ट्रीय उद्यानात अडकलेल्या ३५ भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरामुळे अडकलेल्या ७०० जणांपैकी २०० भारतीय पर्यटक होते. यातील केवळ ३५ जणांना वाचविता आले आहे. अन्य भारतीयांचा शोध सुरु असल्याचे भारतीय दुतावासाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. नेपाळमध्ये गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक गावे पाण्याखाली आली असून काही ठिकाणी भूस्खलन झाले आहे.