नागपूरसह राज्यातील पाच जिल्हा परिषदा राज्य सरकारने बरखास्त केल्या

टीम महाराष्ट्र देशा- राज्यातील पाच जिल्हा परिषदा आज राज्य सरकारने बरखास्त केल्या. नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदूरबार जिल्हा परिषदांचा यामध्ये समावेश आहे. यासोबतच या पाचही जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्याही बरखास्त करण्यात आल्या आहेत. आज राज्याच्या ग्रामविकास खात्याने यासंदर्भातले आदेश जारी केले. आता या पाचही जिल्हा परिषदांच्या ‘प्रशासकपदी’ संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पंचायत समितीच्या प्रशासकपदी गटविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

या पाचही जिल्हा परिषदांचा कार्यकाळ पाच वर्षापेक्षा अधिक झाला होता. नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक फेब्रुवारी -२०१२ मध्ये झाली होती. त्यानुसार फेब्रुवारी-२०१७ मध्ये कार्यकाळ संपणे अपेक्षित होते. मात्र नागपूर जिल्हा परिषदेला ३० मार्च २०१७ च्या पत्रानुसार मुदतवाढ मिळाली होती. अन्य ठिकाणच्या जिल्हा परिषदांचा कार्यकाळ डिसेंबर-२०१८ मध्ये संपणे अपेक्षीत होते. त्यांनाही मुदतवाढ मिळाली होती. या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवरील निर्णयानंतर ग्राम विकास विभागाने तातडीने हे आदेश काढले आहेत.