मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याला पाच वर्षे सक्तमजुरी

Court

बीड : अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला बीड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. न्या. एम. व्ही. मोराळे यांनी हा निकाल दिला. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. मंजूषा दराडे यांनी बाजू मांडली.

गेवराई तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर आरोपी मुन्ना ऊर्फ विनोद उबाळे याने त्याच्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. पीडित मुलीने ही बाब आपल्या आईला सांगितल्यानंतर या प्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात मुन्ना ऊर्फ विनोद उबाळे याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा नोंद केला होता. दरम्यान, या प्रकरणी तलवाडा पोलिसांनी तपास करून आरोपी अल्पवयीन असल्याने बाल न्यायालयात त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

बाल न्यायालयाने आरोपीचे गुन्ह्याच्या वेळीचे वय लक्षात घेता व त्याने केलेल्या गुन्ह्याची त्याला पूर्ण समज असल्याने हे प्रकरण विशेष पोक्सो न्यायालयाकडे वर्ग केले होते. बीड येथील विशेष पोक्सो न्यायालयात न्या. एम. व्ही. मोराळे यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील मंजूषा दराडे यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षाकडून एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. समोर आलेले पुरावे, साक्ष यावरून न्या. मोराळे यांनी मुन्ना ऊर्फ विनोद उबाळे याला या प्रकरणी दोषी धरून ५ वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

महत्वाच्या बातम्या