पाचशे रुपयांची जुनी नोट आता कायमची चलनातून हद्दपार

मुंबई : पाचशे रुपयांची जुनी नोट आता चलनातून पूर्णपणे बाद झाली आहे. रुग्णालय, विमानतळ, पेट्रोल पंप, दूधकेंद्र अशा कुठल्याच ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत. त्यामुळे अद्यापही पाचशेची जुनी नोट तुमच्याकडे शिल्लक असल्यास तुमच्या बँकेत ती जमा करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर गैरसोय टाळण्यासाठी जीवनावश्यक ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारल्या जात होत्या, मात्र अखेर ही मुदतही संपलेली आहे. एक हजारच्या नोटा 24 नोव्हेंबरपासूनच सरकारने बाद ठरवल्या होत्या.

तुमच्याकडे पाचशे किंवा हजारच्या जुन्या नोटा असतील, तर 30 डिसेंबरपर्यंत तुम्ही तुमच्या बँकेत त्या जमा करु शकता. अन्यथा प्रतिज्ञापत्रासह 31 मार्चपर्यंत आरबीआयकडे तुम्ही या नोटा बदलू शकता.