विमानतळ प्रकल्पातील ब्लास्टिंगच्या कामात ५ अभियंते जखमी

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम उलवे येथे सुरू आहे. या कामांमध्ये उलवे टेकडीवर ब्लास्टिंगचे काम सुरू असताना काही दगड उसळून सिडको आणि जी व्ही के कंपनीचे पाच अभियंत्यांना लागले. यामुळे काही जण गंभीर, तर काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत. यातील तीन जण किरकोळ जखमी झाले असून उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दोन जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. विमानतळ प्रकल्पातील उलवा टेकडी सपाटी करणाचे काम चार कंपन्यांना विभागून देण्यात आले आहे. हे काम सुरू होऊन सहा महिने झाले असून आणखी दिड वर्षे हे काम चालणार आहे. तब्बल २ हजार कोटी रुपयांचे हे काम आहे. तसेच साइटवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व काळजी घेण्यात येत असते . दरम्यान ही घटना दुपारी दीड वाजता ही घडली असून जखमींवर सीबीडी येथील अपोलोमध्ये उपचार सुरू आहेत. यामध्ये सिडकोचे अभियंता मयुर कांबळे व अन्य चार जणांचा समावेश आहे. या दुर्घटनेत तीन जण मयत झाल्याच्या अफवा दुपारपासून पसरल्या होत्या. ही माहिती मिळताच सिडकोतर्फे त्वरित वस्तुस्थिती जाहीर करण्यात आली. यामध्ये पाचही जण सुस्थितीत असल्याची माहिती सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी दिली. तसेच या परिसरातील घरांवर किंवा रहिवावर देखील ब्लास्टिंगमधील दगड उडून घरांचे नुकसान होऊन रहिवाशी जखमी झाल्याची माहिती सोशल मिडियावर येत होती. ही माहिती देखील खोटी असून असा कोणताच प्रकार झाला नसल्याचे सिडकोतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.Loading…
Loading...