सव्वा कोटींचे सिगारेट लंपास

नेवासा : – मालवाहू टेम्पोच्या चालक व क्लिनरला मारहाण करत हात बांधून अज्ञात स्थळी नेऊन सोडत टेम्पोतील सुमारे सव्वा कोटी रुपये किंमतीचे सिगारेटच्या पाकिटांचे 207 बॉक्स अज्ञात लुटारुंनी चोरुन नेल्याची घटना मंगळवारी रात्री घडली असून याबाबत शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात अज्ञात लुटारुंवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत टेम्पोचालक विक्रम पंढरीनाथ वर्पे (वय-35) रा. करंदी, ता.शिरुर, यांनी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, नुतन राजमुनी ट्रान्स्पोर्टचा टेम्पो (क्र. एमएच 04-एसडी 8682) मधून मंगळवारी दुपारी रांजणगाव एमआयडीसीतील आयटीसी कंपनीचे 207 बॉक्स सिगारेट भरुन औरंगाबादकडे जात असताना घोडेगाव चौफुलीवर रात्री 9 च्या सुमारास त्यांनी व क्लिनर दत्तात्रय उर्फ विजय मांडे (रा. करंदी, ता. शिरुर) यांच्याबरोबर चहा घेतला.
त्यानंतर टेम्पो घेऊन औरंगाबादच्या दिशेने जात असताना वडाळा बहिरोबा गावाच्या थोडे पुढे पावन गणपती मंदीराजवळ मागून भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने डिप्पर लाईट दिल्यामुळे त्यांनी टेम्पोचा वेग कमी केला. यावेळी मागून येणार्‍या ट्रकचालकाने त्यांच्या टेम्पोजवळून ट्रक नेत त्यांच्या टेम्पोच्या क्लिनर साईडचा आरसा फोडत ट्रक आडवा लावून थांबण्यास भाग पाडले. त्यापाठोपाठच मागून एका कारमधून आलेल्या तीन ते चार जणांनी त्यांच्या टेम्पोत चढून वर्पे व मांडे यांना मारहाण करत त्यांचे हात पाठीमागे बांधले.
त्यानंतर या लुटारुंनी या दोघांना टेम्पोतून खाली उतरवत कारमध्ये बसवून हायवेचा डांबरी रस्ता सोडून कच्च्या रस्त्याने अज्ञात स्थळी लांबवर नेऊन सोडून देत कार घेऊन पसार झाले. बांधलेले हात कसेबसे सोडवून घेत या दोघांनी अंधारातच हायवेच्या दिशेने चालत एका ढाब्यावर आले. ढाबाचालकास या दोघांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग कथन करुन केलेल्या विनंतीवरुन सदर ढाबा चालकाने त्यांना नेवासा पोलीस ठाण्यात नेले.
या दोघांना घेऊन नेवासा पोलिसांचे पथक घटनास्थळाकडे येत असता नगर-औरंगाबाद महामार्गावरील माळीचिंचोरा शिवारातील हॉटेल ‘जय हनुमान-आवो साई’ जवळ त्यांचा टेम्पो उभा असलेला दिसला. मात्र त्यातील सर्वच्या सर्व सुमारे एक कोटी चोवीस लाख वीस हजार रुपये किंमतीच्या सिगारेट चोरट्यांनी गायब केल्या होत्या.
या घटनेची माहिती नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी कळविल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा, श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक रोहिदास पवार, पोलीस उपाधिक्षक अभिजित शिवथरे, यांनी घटनास्थळ तसेच टेम्पोची पाहणी करुन स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना आवश्यक सूचना दिल्या. टेम्पोचालकाच्या फिर्यादीवरुन शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.