विरोध झुगारून पुरंदरेंच्या शिवसृष्टीला सरकारकडून 5 कोटींची मदत सुपूर्द

पुणे : पुण्याच्या कात्रजमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रयत्नातून उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीला केंद्रानं 5 कोटींची मदत सुपूर्द करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 5 कोटींचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित हाेते. पुण्यातील सर्किट हाऊस येथे झालेल्या छाेटेखानी कार्यक्रमात हा धनादेश प्रदान करण्यात अाला.

बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीला पाच काेटींच्या निधीची घाेषणा झाल्यानंतर अनेक राजकीय व सामाजिक संघटनांनी अापली प्रतिक्रीया नाेंदवली हाेती.केंद्र सरकारकडून जेएनपीटी योजनेच्या अंतर्गतबाबासाहेब पुरंदरे यांच्या कात्रज येथील शिवसृष्टीला पाच काेटी देणार असल्याची घाेषणा गुरुवारी करण्यात अाली हाेती. महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन खात्याने बाबासाहेब पुरंदरे यांच्या खासगी शिवसृष्टीला विशेष प्रकल्प म्हणून मान्यता दिली आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने पुण्यातील बावधन येथील बी डी पी च्या जागेवर पन्नास एकर जागेत शिवसृष्टी उभारण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या शिवसृष्टीबाबत काेणत्याही हालचाली हाेत नसताना पुरंदरेंच्या शिवसृष्टीला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पाच काेटींचा धनादेश देण्यात अाल्याने नव्या वादाला ताेंड फुटण्याची चिन्हे अाहेत.

विरोधक विशेषतः राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्ष तसेच संभाजी ब्रिगेडचा विरोधाला न जुमानता सरकारने या प्रकल्पाला सढळ हस्ते मदत केली आहे. त्यामुळे विरोधाची धार अजूनच तीव्र होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.