पैठणच्या संतपीठात तीन विभागातून पाच अभ्यासक्रम शिकवले जाणार

पैठण

औरंगाबाद : पैठण येथील संतपीठाचे लोकार्पण आणि अभ्यासक्रमांची सुरुवात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासून होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते संतपीठाचे लोकार्पण होईल, असे रोहयो मंत्री संदीपान भूमरे म्हणाले. तसेच मंत्री भूमरे आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शनिवारी पैठण येथील संतपीठ प्रशासकीय इमारतीची पाहणी केली. १७ सप्टेंबरला उद्घाटन व १ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला सुरुवात होणार असल्याचेही मंत्री भुमरे यांनी सांगितले.

१ ऑक्टोबरपासून संतपीठातून वारकरी किर्तन व एकनाथी भागवत हे दोन एक वर्ष कालावधी असलेले परिचय प्रमाणपत्र निवासी अभ्यासक्रम व सहा महिने कालावधी असलेले संत एकनाथ महाराज, ज्ञानेश्वरी व गीता परिचय असे एकूण पाच अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे मंत्री भुमरे यांनी सांगितले. या अभ्यासक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहून पुढे सर्वच संतांचा परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून संतपीठात संतसाहित्य, तत्त्वज्ञान व संगीत असे तीन विभाग तयार करण्यात आले आहेत. संतसाहित्य विभागातून परिचय प्रमाणपत्र, तत्त्वज्ञान विभागातून पीएचडी, रिसर्च, डिग्री व डिप्लोमा अभ्यासक्रम तर संगीत विभागातून किर्तन प्रवचण आदी अभ्यसक्रम तयार करण्यात आले आहेत.

विद्यापीठाने संत साहित्याचा अभ्यास असणाऱ्या अभ्यासकांकडून पाच परिचय प्रमाणपत्रचा अभ्यासक्रम तयार केला आहे. या अभ्यासक्रमासाठी संत साहित्याची आवड व ज्ञान असणाऱ्यांना प्रवेश दिला जाईल. सुरुवातीचे पाच वर्ष संतपीठाचा कारभार डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत चालणार आहे. त्यानंतर संतपीठ स्वतंत्र कामकाज करेल. दरम्यान, संतपीठासाठी स्थानिक सल्लागार व स्थाई समितीची निवड करण्यात येणार असल्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या