प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी मिळणार पाच ब्रास वाळू मोफत

मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधण्यासाठी पाच ब्रासपर्यंतची वाळू कोणतीही रॉयल्टी न आकारता मोफत देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात केली.

शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणांची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आजपासून ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाद्वारे लाभार्थ्यांशी संवाद सुरू केला. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आज राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना तसेच रमाई आवास, शबरी घरकुल, पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेच्या चांदा ते बांद्यापर्यंतच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला. विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेल्या लाभार्थ्यांबरोबरच विविध आवास योजनेतून बांधलेल्या घरातील प्रत्यक्ष लाभार्थ्यांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.

प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजनेचा लाभ घेताना कोणत्या अडचणी आल्या, अनुदान वेळेत मिळाले का, शौचालयाचे बांधकाम केले का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी आज प्रत्यक्ष लाभार्थ्यांकडून जाणून घेतली. यावेळी अनुदान थेट बँकेतून मिळत असल्यामुळे राज्य शासनाच्या योजना जलद गतीने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या असल्याच्या व त्या पारदर्शकपणे राबवित असल्याच्या भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या. राज्य शासनाने राबविलेल्या योजनांमुळे पक्क्या व सुंदर घराचे स्वप्न पूर्ण झाल्याचेही या लाभार्थ्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. घरकुलाबरोबरच उज्ज्वला योजना,शौचालय योजनांचा लाभही मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

वर्धा येथील आरती कोट्टेवार व गडचिरोली जिल्ह्यातील फुलेवाडा येथील जावेद शेख यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधताना रेती मिळण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या बांधकामासाठी पाच ब्रासपर्यंत रेती मोफत देण्याची घोषणा केली. तसेच यासंबंधी सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदारांना सूचना देण्यात येणार असल्याचेही सांगितले.