धारासूर व पाथरीत गुटक्यासह पावणेचार लाखाचा मुद्देमाल जप्त

परभणी :  धारासूर (ता. गंगाखेड) व पाथरी शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटका जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी यामध्ये एकाला अटक देखील केली आहे.

फौजदार विश्वास खोले व फौजदार चंद्रकांत पवार यांना धारासूर येथे शासनाने प्रतिबंधित गुटका वाहनातून आणल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरून रविवारी पहाटे टाकलेल्या छाप्यात पथकाने 43 हजार 650 रुपयांचा गुटका जप्त करुन वाहन ताब्यात घेतले आहे.  या कारवाईत दोन लाख 43 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दोघाविरूध्द सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास पथकाने ताब्यात घेतले आहे.

पाथरी शहरात रविवारी सकाळी सातच्या सुमारास केलेल्या कारवाईत एका दुचाकी वाहनावरून गुटका नेणाऱ्या दोघांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 54 हजार रुपयांचा गुटक्यासह वाहन ताब्यात घेतले. या कारवाईत एक लाख 21 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोराेनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमध्ये देखील होत असलेल्या गुटका तस्करी करणे सुरु असल्याने पोलिसांनी या बाबत नियमीतपणे गस्त देखील घालणे सुरु केली आहे. परंतू तरी देखील गुटख्याची तस्करी,काळाबाजार थांबत नसल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या