किलो मागे दीडशे ते एकशे पंच्याहत्तर रुपयाची घट; मच्छीमारांचा होतोय आर्थिक तोटा

पालघर : पापलेट (सरंगा) खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी अचानक पणे किलो मागे दीडशे ते एकशे पंच्याहत्तर रुपयाची घट करुन अनेक समस्यांशी झगडत असलेल्या मच्छीमारांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे मच्छीमारांचा लाखो रुपयांचा होणारा तोटा भरून काढीत त्यांना योग्य भाव मिळवून देण्याचे आव्हान आता सहकारी संस्थाना पेलावे लागणार आहे.

संपूर्ण राज्यातील किनारपट्टीवरील सातपाटी हे गाव मत्स्यव्यवसायात पापलेट,दाढा,घोळ ई. माश्याच्या उत्पादनसाठी अग्रेसर गाव म्हणून सर्वत्र परिचित आहे. दालदा ह्या पारंपरिक मासेमारी पद्धतीने पकडलेल्या माश्यांचे योग्य ते नियोजन करून वेळीच बर्फ मारून ते साठवणूक करण्याच्या पद्धतीमुळे चवीच्या बाबत सातपाटीच्या पापलेटला विशेष मागणी असते.त्यामुळे मागील अनेक वर्षा पासून सातपाटी मधील मच्छिमार सहकारी संस्था व सर्वोदय सहकारी संस्थांनी व्यापारांसोबत ठरवलेला भाव पश्चिम किनारपट्टीवरील जवळपास सर्वच बंदरात लागू होत असे.

मुंबई मधील माश्याच्या निर्यात करणाऱ्या कंपनी पैकी चिराग इंटरनॅशनल,अल्लाना फिश,कॅस्टॉल रॉक,हरून अँड कंपनी,श्रॉफ इंटरप्रयसेस,चांम फिश ई. परदेशात मासे निर्यात करणाऱ्या अग्रगण्य कंपन्या पावसाळी बंदी उठण्याच्या पूर्वीच सहकारी संस्थां मध्ये टेंडरसाठी तळ ठोकून रहात असत. दोन्ही सहकारी संस्थांचे संचालक व तांडेल प्रमुख एकत्रपणे उघड टेंडर पद्धतीने भाव ठरवीत आपले सर्व मासे ह्या व्यापारानाच देत असत.

मासेमारी हंगामाच्या पहिल्या सहा महिन्यासाठी चा भाव ठरल्यानंतर पुन्हा पावसाळी बंदी पर्यतच्या उर्वरित महिन्यांसाठी वाढीव भाव अश्या दोन हंगामासाठी वेगळावेगळा भाव ठरविला जात असे. ह्यावेळी दोन्ही कडून भावाचे योग्य नियोजन केले जात असल्याने व्यापाराचे आणि सातपाटी मच्छीमारा मध्ये खूपच जिव्हाळ्याचे संबंध अनेक वर्षांपासून प्रस्थापित झाले होते. 1 जून ते 31 जुलै ह्या पावसाळी बंदी कालावधी नंतर समुद्रात निर्माण होणाऱ्या तुफानी लाटा, वादळी वारे ह्यामुळे संपूर्ण समुद्र घुसळला जात असल्याने मत्स्य साठे खोल समुद्रातून 50 ते 75 नॉटिकल क्षेत्रात सुरक्षित जागेचा आसरा घेत असतात.हि नेमकी जागा शोधून त्यांना आपल्या जाळ्यात पकडण्यासाठी समुद्रात पहिले जाण्याची शर्यत किनारपट्टीवरील मच्छिमारा मध्ये लागलेली असते. कारण पावसाळी बंदी उठल्यानंतर पहिल्या दोन-तीन महिन्यात मिळणारा पापलेट नंतरच्या सहा महिन्यांच्या कालावधीत जवळपास दुर्मिळ होत असल्याने सुरुवातीच्या कालावधीत जास्तीतजास्त मासे पकडून मोठी आर्थिक आवक जमविण्याचे ध्येय प्रत्येक मच्छिमार ठेवीत असतात.त्यामुळे पहिल्या हंगामातील प्रत्येक दिवस मच्छिमारांसाठी महत्वपूर्ण ठरत असतो. मागच्या एप्रिल,मे महिन्यात पापलेट च्या लहान पिल्लाची मासेमारी इतर वर्ष्याच्या तुलनेने कमी प्रमाणात झाल्याचा फायदा होत मच्छीमाराना ह्या मोसमात चांगल्या प्रमाणात वाढ झालेला पापलेट मिळू लागला आहे.पहिल्या फेरीला गेलेल्या नौकाना कमीतकमी 500 किलो ते जास्तीत जास्त 1 हजार किलो पर्यंत पापलेट मिळाले आहेत.त्यामुळे आपल्यावर असलेली बँक,सहकारी संस्था,खाजगी व्यापारी,एनसीडीसी ची अनेक वर्षांपासूनची कर्ज फेडून आपल्या जवळ दोन पैसे जमेला ठेवता येतील अशी अपेक्षा ते ठेवून होते. मागील सन 2015-16 ह्या वर्षात सुपर पापलेट 1350 रुपये प्रति किलो,एक नंबर ला 1125 रु,दोन नंबर ला 840 रु.,तीन नंबर ला 625 रु,तर चार नंबर पापलेट ला 416 रु. चा भाव साधारण पणे व्यापारानी दिला होता.प्रत्येक वर्षी ह्यामध्ये काही रुपयांची दरवाढ होत असल्याची पद्धत असताना ह्यावर्षी मात्र व्यापारानी प्रथम मासे खरेदीला नकार देत मागच्या वर्ष्याच्या तुलनेत वाढ करण्याऐवजी मोठी घट केली. मागच्या वर्षीचे मासे आमचे अजून शिल्लक असून डॉलर चा भाव घसरणे,मासे आयात करणाऱ्या चीनशी दुरावत चाललेले संबंध ई. करणे देत सुपर पापलेट ला 1150 रु.एक नंबर ला 850 रु,दोन नंबर ला 700 रु,तीन नंबर ला 500 रु व चार नंबर ला 300 रुपये असा भाव खरेदीला आलेल्या दोन कंपनीनी दोन्ही सहकारी संस्थांना दिला.प्रत्येक नौकाना मोठ्या प्रमाणात मिळलेज असल्याची माहिती काही लोकांनी आधीच ह्या व्यापाराना दिल्याने मच्छीमारांची कोंडी करण्याची आयती संधी व्यापाराना मिळाल्यानेचे व्यापारानी पूर्वी दिलेल्या भावात अजून घसरण करून संस्थांची आर्थिक कोंडी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे मागच्या वर्षाच्या भावानुसार प्रति किलो मागे तब्बल 171 रुपयांची घसरण दोन्ही सहकारी संस्थांना नाईलाजाने स्विकारावी लागली आहे. त्यामुळे पहिल्याच फेरीत मच्छीमाराना प्रत्येकी एक ते तीन लाखाचा फटका बसल्याचे दिसून आले.

पूर्वी इथल्या संस्थांशी सलोख्याचे संबंध असलेल्या मुंबई मधील व्यापाराचे पापलेट खरेदी बाबत वर्चस्व होते मात्र कालांतराने त्यातील काही कंपन्या बंद पडल्या तर काही व्यापारानी आपल्या व्यवसायात बदल केल्याने आता ह्या व्यवसायात पोरबंदर, गुजरात मधील काही ठराविक व्यापाराचे वर्चस्व प्रस्थापित होत त्यांनी एकत्र येत सिंडिकेट करून पापलेट चा दर कमी केल्याचे काही मच्छीमारांचे म्हणणे आहे.पापलेट,दाढा,घोळ ई. निर्यात होणाऱ्या माश्यासह घोळ,दाढ्या चे भोत (पोटातील पिशवी) ई च्या खरेदीमध्ये काही ठराविक व्यापारांची मक्तेदारी असल्याने त्याचा फायदा उचलीत मच्छीमारांची पिळवणूक केली जात असल्याच्या भावनेपोटी मच्छीमारामधून संतप्त भावना उमटत आहेत.त्यामुळे दोन्ही सहकारी संस्था,नौका मालक पुन्हा व्यापारांशी चर्चेच्या आधारे लाखो रुपयांचा होत असलेला तोटा काही अंशी कमी करण्याचा प्रयत्न करतील असा आशावाद मच्छिमारा मधून व्यक्त केला जात आहे. प्रतिक्रिया… छोटे मासे निर्यात होत नसून आधीचा जुना माल शिल्लक आहे. डॉलरचा दर घसरला आहे. अशी विविध कारणे सांगून व्यापाऱ्यांनी आम्हाला कोंडीतच पकडले आहे. – रवींद्र म्हात्रे, चेअरमन, सर्वोदय सहकारी संस्था.