fbpx

भाजपकडून राजकिय फायद्यासाठी सर्जिकल स्ट्राईकचा वापर – कॉंग्रेस  

नवी दिल्ली :  दोन वर्षांपूर्वी भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. या सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ आतासमोर आला आहे. जवानांनी कशाप्रकारे  दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त केली हे या आठ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे.

भारतीय सैन्यातील पॅरा कमांडोंच्या आठ पथकांनी सर्जिकल स्ट्राईक केला होता. सर्जिकल स्ट्राईकदरम्यान भारतीय सैन्याने रॉकेट लॉन्चर, मिसाईल आणि छोट्या शस्त्रांसह हल्ला केला होता. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर सर्व कमांडो सुरक्षित परतले होते.

दरम्यान हा व्हिडीओ समोर आल्याने आता राजकीय आरोप – प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना दिसत आहे. राजकीय फायद्यासाठी जवानांच्या बलिदानाचा अपमान केला जात आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकार आणि भाजप देशाच्या सैनिकांचा तसंच सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय फायदा घेण्यासाठी सर्व प्रयत्न करत असल्याची टीका हा व्हिडीओ समोर आल्यानंतर केली आहे.

“दहशतवाद्यांविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा आणि देशाविरोधातील दहशतवादी मनसुबे उद्ध्वस्त करण्यासाठी काँग्रेसने सैन्याचे आभार मानले होते. पण दुर्दैवाने भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्जिकल स्ट्राईकचा लाजिरवाण्या पद्धतीने वापर केला,” असंही सुरजेवाला यावेळी म्हणाले.