कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग औरंगाबादमध्ये, राज्य शासनाकडून ३० कोटींची तरतूद

टीम महाराष्ट्र देशा : राज्याला यंदा भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वर्षी पावसाचे प्रमाण देखील कमी अधिक असणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचं ठरवले आहे. कृत्रिम पाऊसासाठी राज्य शासनाकडून ३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीत या प्रयोगासाठी विमानाचे उड्डाण औरंगाबाद येथून करणयाचे निश्चित झाले आहे. त्यामुळे पहिला कृत्रिम पाऊस हा औरंगाबादमध्ये पडणार आहे.

कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदावर १३ जून रोजी निर्णय घेण्यात आला. १ जुलैपर्यंत औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात सी-बॅण्ड डॉपलर व रडार दाखल होणे शक्य आहे. येथील विमानतळावरून प्रयोगासाठी विमान उडेल. राज्याच्या सर्व ठिकाणांवरून ४५० कि़ मी. च्या अंतरात औरंगाबाद मध्यवर्ती केंद्र आहे. त्यामुळे येथूनच प्रयोग होण्याची शक्यता आहे.

दरम्यान २०१५ रोजी औरंगाबाद आणि २०१७ मध्ये सोलापूर येथून कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला होता. मात्र दोन्ही वेळेस हा प्रयोग फसला होता. त्यामुळे कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे काम हे बेभरवशाचे असल्याच दिसत आहे.