इतिहासात प्रथमच विरोधकांचा एकत्रित सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार

Opposition-boycott-on-pune-municipal-corporation

पुणे : सभागृहाचे कामकाज कसे चालवावे हे विरोधकांनी शिकविण्याची गरज नाही. तसेच यापुढे कामात अडथळे निर्माण केल्यास विरोधकांवर निलंबनाची कारवाई करण्याचे भाष्य सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी केले होते. या वक्तव्याचा आक्रमक  निषेध नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेने मंगळवारी मुख्य सभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. आजवरच्या पालिकेच्या इतिहासात प्रथमच विरोधकांनी एकत्र येत सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याची घटना घडली आहे .

मागील मुख्य सभेत सत्ताधारी भाजपने महापालिकेने काढलेल्या कर्जरोख्यांच्या निर्णयाचे अभिनंदन करत तहकुबी मांडली होती, तर विरोधकांतर्फे कर्जरोख्यांच्या निर्णयाचा निषेध करणारी तहकुबी मांडली . मात्र, सत्ताधारी पक्षाची तहकुबी स्वीकारण्यात आली. त्यामुळे विरोधकांनी दिलेला सभा तहकुबीचा प्रस्ताव वाचण्याचे सौजन्यही दाखविले जात नसल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली. सत्ताधारी भाजपकडून सभागृह नियमावली पायदळी तुडवली जात असून, विरोधकांची मुस्कटदाबी होत आहे. हा रडीचा डाव असल्याची खरमरीत टीका विरोधी पक्षांनी केली होती. त्यावर मुख्य सभेत कसे बोलावे याचे भान विरोधकांना नसून, त्यांनी आम्हाला सभेची नियमावली शिकविण्याची गरज नाही. यापुढे विरोधकांनी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यास मागेपुढे पाहिले जाणार नाही, अशा शब्दांत सभागृहनेते भिमाले यांनी विरोधकांना सुनावले होते. त्याचे पडसाद मंगळवारी मुख्य सभेत उमटले.