fbpx

देशातील पहिल्या सिग्नल शाळेचे यश; एक अभिनव उपक्रम

ठाणे/प्राजक्त झावरे पाटील : ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ संस्थेने २ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या देशातील उपक्रमला यंदाच्या दहावीच्या निकालाने अभिनव म्हणून अधोरेखित केले आहे.. हो हा अभिनव उपक्रम म्हणजे सिग्नल शाळा…!

शहरातील सिग्नलवर गजरे, फुले आणि प्लास्टिकच्या वस्तू विकणाऱ्या मुलांच्या नशिबी शालेय शिक्षण कधीच येत नसते. पोटाच्या खळगीसाठी कुटुंबासह वणवण करत भटकण्याशिवाय या मुलांसमोर पर्याय नसतो. घर नसल्याने शाळेमध्येही प्रवेश मिळण्यासाठी व सातत्याने शाळेत जाण्यासाठी अडचणी तर असतातच तसेच सोबत सिग्नलवरचे जगणे सुरू राहते. हे चित्र पालटण्यासाठी ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला आणि ठाणे महापालिका दोन वर्षांपूर्वी पहिलीवहिली सिग्नल शाळासुरू केली. त्यामुळे सिग्नलवर फिरणाऱ्या चिमुकल्यांच्या हातामध्ये फुलांच्या ऐवजी पाटी पेन्सील दिसू लागली. तीन हात नाक्याच्या सिग्नलवरील गाडयांच्या कर्कश आवाजात पाढयाचें मधुर सूर ऐकू येऊ लागले आणि सिग्नल शाळा फुलू लागली.

सुरवातीला या उपक्रमाच यश कितपत असेल, याबाबत साशंकता उपस्थित केली जात होती परंतु नुकताच लागलेल्या दहावीच्या निकालात शाळेने घेतलेली भरारी गौरवास्पद आहे. दहावीतील मोहन प्रभू काळे आणि दशरथ पवार यांनी जिद्द, आत्मविश्वास, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर दहावीच्या परिक्षेत ७६℅ आणि ६४% गुण मिळवले. सिग्नलवरील मुलांच्या विश्वात हे यश नक्किच उभारी आणेल.

या उपक्रमाला भरीव बळ देणारे आयुक्त संजीव जैस्वाल, उपायुक्त मनीष जोशी, शिक्षणाधिकारी उर्मिला पारधे यांच्यासह शिक्षण विभाग व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे , कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार व माजी महापौर संजय मोरे, खासदार श्रीकांत शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, शिक्षण सभापती विकास रेपाळे यांनी अभिनंदन केले.